
जळगाव l प्रतिनिधी l शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच, एम.आय.डी.सी. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत एका दुचाकी चोरट्याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर हस्तगत केली असून परिसरात पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
तांबापुरा भागातील रहिवासी अरुण सखाराम अहीरे (वय ३८) यांनी ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक MH-28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना आपली दुचाकी जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी तातडीने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तपासाची चक्रे अन् आरोपी जेरबंद
फिर्यादीच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली.
या पथकाने केली कारवाई :
पो.उ.नि. धनेक, नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राहुल घेटे यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी साहील महोमद तडवी (वय २८, रा. मच्छीबजार, तांबापुरा) या संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी साहीलने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही रवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज घुले करीत आहेत.





