
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा
नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन; सायबर पोलिसांत तक्रार दाखल
जळगाव | प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या शहरातील एका व्यापाऱ्याची तब्बल ३९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समीर नटवरलाल शहा (वय ६२, रा. नागेश्वर कॉलनी, महाबळ रोड) यांचा विश्वास संपादन करून अज्ञात सायबर ठगांनी ही फसवणूक केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२५ ते दि. ३ मार्च २०२६ या कालावधीत ‘काहिरा मेहता’, ‘हेमंत मेहता’ आणि ‘सीएपीटी कस्टमर सर्व्हिस’ या नावाने काही अज्ञात व्यक्तींनी शहा यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यांनी स्वतःला ‘सीएपीटी शेअर्स मार्केटिंग कंपनी, यूके’चे व्यवस्थापक असल्याचे सांगत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला १० हजार रुपयांवर तात्काळ नफा देऊन त्यांनी शहा यांचा विश्वास जिंकला.
यानंतर जादा परताव्याचे आश्वासन देत संशयितांनी शहा यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार शहा यांनी वेळोवेळी एकूण ३९ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला, ना गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी शहा यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन सायबर ठगांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.





