राजकीयशासकीय

नगरसेवक रमेश मतानी यांच्या ‘थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रा’वर मनपात सुनावणी पूर्ण

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नगरसेवक रमेश मतानी यांच्या ‘थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रा’वर मनपात सुनावणी पूर्ण

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

जळगाव | २० ऑगस्ट २०२६ l जळगाव शहर महानगरपालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील दुकानाच्या थकबाकीप्रकरणी स्वीकृत नगरसेवक रमेश रिझूमल मतानी यांना देण्यात आलेल्या ‘थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रा’वर तक्रार करण्यात आली आहे. हे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीवर गुरुवारी २० ऑगस्ट मनपाच्या उपायुक्त (महसूल) धनश्री शिंदे यांच्या दालनात सुनावणी झाली.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले

सुनावणीदरम्यान रमेश मतानी यांच्या वतीने नगरसेवक प्रकाश बालानी यांनी लेखी म्हणणे सादर केले. तर तक्रारदार जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा यांच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी भारत ससाणे यांनी विविध न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत लेखी तसेच तोंडी युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंचे म्हणणे, संबंधित कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे सुनावणीदरम्यान प्रशासनाने ऐकून घेतले. या प्रकरणातील शासन आदेश, कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

विधी विभागाच्या अभिप्रायानंतर आदेश

उपायुक्त (महसूल) धनश्री शिंदे यांनी सुनावणीदरम्यान महापालिकेच्या विधी विभागाचा कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर याप्रकरणी आदेश पारित करण्यात येतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता विधी विभागाच्या अभिप्रायाकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुनावणीच्या सुमारास स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी हे महानगरपालिकेत दाखल झाले होते. त्यांच्यासोबत अनेक नगरसेवकांसह काही कार्यकर्ते उपस्थित होते.

अंतिम आदेशाकडे लक्ष 

गुरुवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे नोंदविण्यात आले आहे. आता विधी विभागाचा अभिप्राय आणि त्यानंतर उपायुक्त (महसूल) धनश्री शिंदे यांच्याकडून होणाऱ्या अंतिम आदेशाकडे तक्रारदारांसह संबंधितांचे आणि महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button