अपघातइतरखान्देशमहाराष्ट्रराजकीय

स्टेडियमचे पाणी शहराच्या वाट्याचे नको; स्वतंत्र जलव्यवस्था करा

स्टेडियमचे पाणी शहराच्या वाट्याचे नको; स्वतंत्र जलव्यवस्था करा

जळगावच्या भविष्यातील पाणीगरजेचा विचार करून आमदार राजूमामा भोळे यांची शासनाकडे मागणी

जळगाव, प्रतिनिधी : शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ आणि आगामी काळातील वाढणारी पाणीगरज लक्षात घेता नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टेडियम व क्रीडा संकुलासाठी जळगावच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त भार टाकू नये. या प्रकल्पासाठी स्वतंत्र जलस्रोत अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी शासनाकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

जळगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रस्तावित हद्दवाढीनंतर शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांची पाणीगरजही वाढणार आहे. सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर नागरिकांची गरज भागवितानाच विविध अडचणी आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या क्रीडा संकुलाची पाणीगरजही त्याच व्यवस्थेतून भागविल्यास भविष्यात नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे स्टेडियमसाठी स्वतंत्र जलस्रोत, स्वतंत्र पाणी आरक्षण किंवा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना यापैकी व्यवहार्य पर्याय निश्चित करावा. उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा तांत्रिक अभ्यास करून त्यानुसार आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, असेही आमदार भोळे यांनी म्हटले आहे.

“विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम होता कामा नये. स्टेडियमसाठी स्वतंत्र जलव्यवस्था करणे हा भविष्यासाठी योग्य आणि दूरदृष्टीचा निर्णय ठरेल,” असे आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.

शहराच्या पुढील २५, ५० आणि १०० वर्षांच्या पाणीगरजेचा विचार करून दीर्घकालीन जलनियोजन आराखडा तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button