
जळगावात १२ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात
गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा; साधेपणाने विवाह करण्याचा संदेश

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा आम सामूहिक विवाह समितीच्या वतीने १२ गरीब, गरजू व होतकरू जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज रफीक यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर मुफ्ती हारून नदवी यांनी नात शरीफ सादर केली. यामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
विवाहाचा खर्च कमी करण्याचा उद्देश
सामूहिक विवाह सोहळ्यामागील उद्देश स्पष्ट करताना हाफिज दानिश यांनी गरीब व गरजू कुटुंबांना विवाहाच्या वाढत्या खर्चातून दिलासा देणे, अनावश्यक रूढी-परंपरा आणि दिखाऊपणाला आळा घालणे, तसेच साध्या पद्धतीने विवाह करण्याची परंपरा रुजवणे आवश्यक असल्याचे सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनी अशा उपक्रमांना सहकार्य केल्यास गरजू कुटुंबांतील मुलींचे विवाह सन्मानाने पार पडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. अब्दुल करीम सालार, फारूक शेख, शमीभा पाटील (फैजपूर) आणि डॉ. नीलेश चांडक यांनी मनोगत व्यक्त करत सामूहिक विवाह उपक्रमाचे कौतुक केले. विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणा टाळून साधेपणा, बंधुभाव व मानवतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील प्रेम, एकोपा आणि सामाजिक ऐक्य वाढते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
१२ जोडप्यांचे निकाह
विवाह सोहळ्यातील धार्मिक विधी हाफिज रफीक आणि मुफ्ती हारून नदवी यांनी पार पाडले. त्यांनी १२ जोडप्यांचे निकाह लावून दिले. नवदाम्पत्यांच्या सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी विशेष दुआ करण्यात आली.
या सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या वरांची नावे : आलम अली, आवेश बेलदार, शाहिद खान, पठाण आदिल, अफसर शेख, जीशान शेख, मोहम्मद यासीर, मुबश्शिर शेख, मोहम्मद इस्राईल, निहाल शेख, इमरान शाह आणि सय्यद जुबेर.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासिम उमर यांनी केले. गरीब वडिलांच्या डोक्यावरील मुलीच्या लग्नाचा आर्थिक भार कमी करणे ही मानवतेची महान सेवा असून, गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हे पुण्याचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अमजद पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी हाफिज वसीम पटेल, इरफान शेख, निजाम सूफी, रेहान पिंजारी, हाफिज दानिश, शकीर देशपांडे, हाफिज इक्बाल, सलमान शेख आणि शाहिद पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.




