
जळगावात हवाल्याच्या पैशांची वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलेटवरून जाताना तालुका पोलिसांची कारवाई; ७.५० लाखांची रोकड, दोन मोबाईल आणि दुचाकी हस्तगत

जळगाव (प्रतिनिधी) : अडावद येथून हवाल्याच्या माध्यमातून रक्कम गोळा करून त्या पैशांतून सोन्याची बिस्किटे खरेदी करून पार्सल पाठविण्याच्या संशयावरून जळगाव तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ७ लाख ५२ हजार १२० रुपयांची रोकड, बुलेट दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत अडावद येथील दोन व्यक्ती हवाल्याच्या माध्यमातून पैसे गोळा करून त्या रकमेतून सोन्याची बिस्किटे खरेदी करतात आणि त्याचे पार्सल पाठवतात, अशी माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहिम बेग आणि मंगळ नथ्थू साळुंके यांना पाठविण्यात आले होते.
त्यानुसार मंगळवारी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील विटभट्टीजवळ पोलिसांना एमएच १९ ईयू १८८४ क्रमांकाच्या बुलेटवरून दोन जण जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, बुलेट चालविणारा हरीष राजेंद्र महाजन (वय ३०) आणि मागे बसलेला सुजित गोकुळ महाजन (वय २६, दोघे रा. बालाजी मंदिराजवळ, अडावद, ता. चोपडा) यांच्याकडे रोकड आढळून आली.
पोलिसांनी दोघांना शहर वाहतूक शाखेत आणून त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली. त्यात १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५ लाख रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात अडीच लाख रुपये, अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड मिळाली. याशिवाय २ लाख ५० हजार रुपये किमतीची बुलेट, ६५ हजार रुपये किमतीचा आयफोन, २८ हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल आणि हरीष महाजन याच्याकडील २ हजार १२० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण १० लाख ९५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रहिम रज्जाक शेख यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जप्तीचा पंचनामा केला. पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहिम बेग यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ नुसार नॉन-कॉग्निझेबल गुन्हा क्रमांक ९८७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी पोलीस नाईक विजय निकम करीत आहेत.




