
भुसावळात ५२ वर्षीय व्यक्तीची गोळी झाडून आत्महत्या; परिसरात खळबळ
भुसावळ: गंगाराम प्लॉट परिसरात सोमवारी (दि. १२ मे २०२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका ५२ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नाव डिगंबर मेंदिराम बढे (वय ५२, रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कौटुंबिक वादातून आत्महत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे पत्नीसह गंगाराम प्लॉट येथे राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. यामुळे त्यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यांच्या मुलीचा विवाह झाला असून, ती खडकी (ता. भुसावळ) येथे सासरी राहते. सोमवारी सकाळी घरात कोणीही नसताना डिगंबर यांनी विनापरवाना बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले. गोळीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.पोलिसांचा तपास सुरू घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात गोळी थेट डोक्यात घुसल्याचे आणि बंदुकीत फक्त एकच काडतूस असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, ही बंदूक विनापरवाना असल्याचेही समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.परिसरात शोककळा डिगंबर बढे यांच्या आत्महत्येमुळे गंगाराम प्लॉट परिसरात शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादाचे गांभीर्य आणि त्यामुळे घडलेली ही घटना यामुळे स्थानिकांमध्येही चर्चा सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.