खान्देश टाइम्स न्यूज | २ सप्टेंबर २०२३ | भुसावळ तालुक्यातील ‘खून का बदला खून’ची मालिका सुरूच असून जुन्या वादातून खून करण्याचे प्रकार पुन्हा घडले आहेत. भुसावळ जवळ असलेल्या कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार व चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली असून आहे. शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) अशी मयतांची नावे आहेत. तसेच मध्यरात्रीनंतर हिस्ट्रीशिटर निखील राजपूतचा देखील पाण्याच्या टाकीवर भोसकून खून करण्यात आला आहे.
भुसावळ जवळच असलेल्या कंडारी गावातील शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या भावंडांचा गावातील एक परीवाराशी जुना वाद आहे. शुक्रवारी जुना वाद पुन्हा उफाळून आला असता हल्लेखोरांनी भावंडांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तलवारीसह चाकूचा सपासप वापर करण्यात आल्याने दोन्ही भावंड जागीच गतप्राण झाली तर इंगळे व साळुंखे नामक इसम जखमी झाला असून त्यांना ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रामा सेंटरमध्ये रवाना करण्यात आले असून हल्लेखोरांची माहिती काढण्याचे काम यंत्रणेने सुरू केले आहे. पोलिसांना आतापर्यंत संशयित म्हणून दीपक छगन तायडे व मनोज मोरे यांची नावे कळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
हिस्ट्रीशिटर निखील राजपूतचा खून
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे.