चोपडा l ४ सप्टेंबर २०२३ l शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत समाजकार्यात योगदान देणाऱ्या टीडीएफ संघटनेचे तालुकाध्यक्ष व आदर्श शिक्षक मंगेश रमेश भोईटे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संगमनेर येथील थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृहात जाणीव फाउंडेशन च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, नाशिकचे ॲड .नितीन ठाकरे, सौ राणीताई लंके, प्रा. बाबा खरात, सुभाष सांगळे ,बी आर चकोर, जि प सदस्य अजय फटांगरे, ॲड. अशोक हजारे ,तुळशीनाथ भोर दिनकर काकड, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, समन्वयक अंतोन मिसाळ , अमित पाटणकर, अभिजीत पाटणकर, राजू आडांगळे , बाळासाहेब पुलाटे,सतीश गोरडे,आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते सन्मानचिन्ह शाल बुके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना डॉ तांबे म्हणाले की, शिक्षण हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणामुळे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. यापुढील काळातही शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी करताना इंग्रजी सारखे शिक्षण ग्रामीण भागातूनही जिल्हा परिषद शाळेतून दिले गेले पाहिजे. संगमनेर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळांमधून गुणवंत विद्यार्थी घडवले जात असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र झाला आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या गुणगौरव सोहळ्यात सन्मानित झालेल्या सर्व शिक्षकांनी यापुढील काळात सेवाव्रत म्हणून या शिक्षणाची पवित्र जबाबदारी अधिक सक्षमतेने पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
तर ॲड नितीन राव ठाकरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात व आ डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासाबरोबर शिक्षणाचे केंद्र म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात आहे. शिक्षण क्षेत्रातही अनेक समस्या असून या समस्या सोडवत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा होणारा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नसून ग्रामीण भागातही गुणवत्तेमुळे अनेक मुले पुढे आली आहेत. शिक्षण हे क्षेत्र पवित्र असून शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील सर्व शिक्षक बंधूंना यावेळी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी सौ राणीताई लंके, सीमंतिनी ताई कोकाटे, प्राचार्य डॉ दिनानाथ पाटील, भाऊसाहेब गोरे, मंगेश भोईटे यावेळी शिक्षणासह समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा जाणीव पुरस्काराने सन्मान करण्यात आला
या गुणवंत शिक्षकांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,आमदार सत्यजित तांबे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड संदीप पाटील जळगाव, आर. एच, बाविस्कर, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे