जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन राहून हे शिवीर घेण्यात येते. ज्यात मातृभाषा हिंदी नसलेले आणि हिंदीत साहित्य लिखाण करणाऱ्या ३० शिविरार्थींना सहभाग दिला जातो.या सहभागींना हिंदी साहित्याचे विद्वान विविध विषयांवर योग्य ते मार्गदर्शन करतात.
यावर्षी महाराष्ट्र राज्यात हे शिवीर केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली आणि मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगावच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ ते २१ ऑक्टोबर या काळात आयोजित केले जात आहे. ज्यामध्ये मराठी, उर्दू, बांगला, तमिळ आणि उडिया मातृभाषा असणारे एकूण ३० नवलेखक भारताच्या विविध ठिकाणाहून सहभागी होत आहेत. कविता, गीत, लोकगीत, गझल, कथा, नाटक, कादंबरी, संस्मरण, डायरी, निबंध, रेडियो, दूरदर्शन, जाहिरात, ब्लॉग, पत्रकारिता, अनुवाद अशा विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यात डॉ.हुकुमचंद मीना, डॉ.महेंद्र ठाकूरदास, डॉ.विजयप्रसाद अवस्थी आणि डॉ.योगेश पाटील हे बहिस्थ विद्वान म्हणून तर प्रा.अरुण पाटील, डॉ.उषा शर्मा, डॉ.सुभाष महाले, डॉ.संजय रणखांबे, डॉ.पुरुषोत्तम पाटील हे स्थानिय हिंदी साहित्याचे विद्वान म्हणून आपले शिविरातील सहभागी नवलेखकांना उद्बोधन करणार आहेत. शिविराचे उद्घाटन केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली आणि केंद्रीय हिंदी संस्थान, आगरा येथील निदेशक प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते होईल तर समारोपाला क.ब.चौ.उमवि च्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय शर्मा हे प्रमुख पाहुणे असतील. या शिविराचे प्रमुख संयोजक मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे असतील आणि हिंदी विभागाचे प्रा.विजय लोहार हे समन्वयक असतील तर डॉ.मनोज महाजन हे सह-समन्वयक असतील. सोबत विभाग प्रमुख डॉ.रोशनी पवार आणि प्रा.उज्ज्वला पाटील यांचे सहकार्य असणार आहे.