राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत डॉ. इकबाल नबी यांना विजेतेपद
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंचावले नाव
जळगाव l ०४ ऑक्टोबर २०२३ l औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील निबंध लेखन स्पर्धेत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बधिरीकरणशास्त्र विभाग विभागातील कनिष्ठ निवासी डॉ. इकबाल नबी यांना विजेतेपद मिळाले. याबद्दल त्याचा अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी महाविद्यालयीन परिषदेच्या बैठकीत विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सन्मान केला. यामुळे जळगावच्या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यंदाचा सप्टेंबर २०२३ हा वेदना जनजागृती महिना म्हणून साजरा केला गेला. त्यासाठी “सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन” आणि बधिरीकरण शास्त्र विभाग एम. जी. एम. वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली गेली होती. यामध्ये बधिरीकरणशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील डॉ. इकबाल नबी, डॉ. रूपाली काठोळे, डॉ. सोनू मडावी या कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात डॉ. इकबाल नबी यांना राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यांना बधिरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. याबाबत मंगळवारी झालेल्या महाविद्यालयीन परिषदेत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी डॉ. इकबाल नबी यांचे कौतुक करीत सन्मान केला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, यांचेसह प्राध्यापक व विभाग प्रमुख उपस्थित होते.