नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकांमध्ये बघितलं जात आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणुकांमध्ये मिझोरम राज्याच्या विधानसभेसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मध्यप्रदेश राज्यात १७ नोव्हेंबर, छत्तीसगड राज्यात ७ नोव्हेंबर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेंलगणाला ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या सर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या ३ डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान, आगामी काळात लोकसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे आता लोकसभेची सेमी फायनल म्हणून बघितलं जात आहे. या निवडणुकांवरून लोकसभेची निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध इंडिया आघाडी असा सामाना असून निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.