
भरधाव लक्झरी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील गडखांब रस्त्यावर शनिवारी (दि. १८) सायंकाळी भरधाव लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील हा तरुण सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १९ सीपी २९८७) गडखांब येथून दहिवद फाट्याकडे निघाला होता. त्याचवेळी चोपड्याकडून अमळनेरकडे जाणारी राजमुद्रा लक्झरी बस (क्रमांक एमएच ०९ ईएम ९०६३) ओव्हरटेक करताना दुचाकीला धडकली. धडकेमुळे दिनेश आणि त्याची दुचाकी सुमारे ५० फूट फरफटत गेली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर दिनेशचे काका विनोद पाटील आणि स्थानिकांनी बस थांबवून त्याला बाहेर काढले, परंतु अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयताच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांनी बसचालक चुनीलाल सुभाष बडगुजर (रा. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करत आहेत.





