जळगाव धूलिवंदन झाल्यानंतर वाघूर धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी घडली होती आज दुपारी २६ रोजी त्याचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . रोहित कैलास पाटील (वय १८, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रोहित पाटील हा तरूण आपल्या आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता. सोमवारी २५ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त गावात तरुणांनी होळी खेळली. त्यातील काही तरुण हे दुपारी १२.३० वाजता पोहण्यासाठी कंडारी-रायपूर शिवारातील वाघूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील रोहित पाटील याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा शोध घेतला.
अखेर मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रोहितचा मृतदेह धरणात मिळून आला. त्याला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.