जळगाव: शहरातील टॉवरचौ कातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तून आणि ४ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेंदलाल मिल परिसरात राहणारा आरोपी किरण दिलीप सपकाळे (वय-३४) हा शहरातील टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर हातातगा गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक किशोर निकुंभ आणि पो. कॉ. तेजस मराठे यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी पथकाने दुपारी अडीच वाजता कारवाई करत नवजीवन कलेक्शन दुकानासमोरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे याला अटक केली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि ४ हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस असा एकूण १४ हजार
रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, पोहेकॉ राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, पोलीस नाईक किशोर निकुंभ, योगेश पाटील, पोका रतन गिते, पो.कॉ. तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.