जळगाव ;- येथील ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता येथील जुने जळगाव भागातील गोपाळपुरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत देविदास पाटील (वय ३२, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई व भाऊंसह राहतो. एसटी वर्कशॉपजवळ पानटपरी चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी सकाळी तो त्याच्या मित्रांना एसटी वर्कशॉपजवळ भेटला होता. त्यानंतर तो घरी गेला. कुठल्यातरी कारणाने त्याने छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान, नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. शनिपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शशिकांत पाटील याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.