जळगाव (प्रतिनिधी) : वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी तब्बल २६ महिलांना अटक केली. तसेच या गँगमधील एक अल्पवयीन मुलगीही पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी त्यानची कसून चौकशी केल्यानंतर या टोळीने मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक व धुळे याठिकाणी पार पडलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये हातसफाई केल्याची माहिती पोलिस् अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
नाशिक, धुळे व अन्य ठिकाणी झालेल्या शिवमहापुराण कथांमध्ये सोनपोत लांबविणाऱ्या मध्यप्रदेशातील २६ महिला व एक अल्पवयीन मुलगी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या. ही गँग मध्यप्रदेशातील असून त्यांच्यावर तेथे चोरी, घरफोडी, सोनपोत चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान, वडनगरी फाटा येथे सुरू झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणाहून लांबवलेल्या ३२ ग्रॅम सोन्यापैकी पाच ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून २६ महिलांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही टोळी मध्यप्रदेशातील धडेली हाडी पिंप्री, बरडीया, हिंगोलीया, धडेली चारभूजा, हाडी पिपल्या, बरखेडा या गावातील आहे. या टोळीतील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असून १३ संशयित एका गावातील तर ८ संशयित महिला एका गावातील अन्य इतर गावातील असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरुद्ध तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी ही टोळी गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी लांबवित असल्याचे समोर आले आहे. या टोळीने मालेगाव, धुळे याठिकाणी पार पडलेल्या कथेमध्ये देखील हातसफाई केली. याठिकाणाहून त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एलसीबीने पकडलेल्या टोळीकडून सुमारे ५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.