सावदा ;- शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीची विनयभंग करून फरार झालेला संशयित आरोपी तथा शाळा समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
सावदा येथील एका शाळेतील विद्यार्थीनीचा शाळेच्या चेअरमननेच विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शालेय समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या प्रमुख संशयितासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी हे फरार झाले होते.
दरम्यान, अक्रम खान अमानुल्ला खान याला अटक करण्यात येत नसल्याने पालकवर्ग मोठ्या प्रमाणात संतप्त झाला होता. यातून काही दिवसांपूर्वी पालकांनी पोलीस स्थानकावर धडक देऊन संशयितांना अटकेची मागणी केली होती. या अनुषंगाने सावदा पोलिसांनी शालेय समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना भुसावळ येथील सत्र न्यायालयात सादर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना देखील तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.