
जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; सुपारी बाग परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय व्यक्त
जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने बुधवारी शहरात मोठी खळबळ उडाली. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश बोरसे हा मंगळवारी सायंकाळपासून घरातून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्याचा शोध घेतला. मात्र बुधवारी सकाळी सुपारी बाग परिसरातील एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.
घटनेनंतर नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवला.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूपूर्वी रितेशने मद्यप्राशन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अधिकृत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, रितेशचे कोणाशीही वैर नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रितेशच्या पश्चात आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.





