जळगाव : शेअर खरेदी करून त्यातून अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवत रमेश शंकरलाल मोर (वय ६५, रा. पाचोरा) यांना ३३ लाख ३० हजारात गंडविले. ही घटना दि. १९ जानेवारी ते दि. २९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी जेसिका नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दि. ५ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील व्यापारी असलेले रमेश मोर यांना जेसिका नामक व्यक्तीने दि. १९ जानेवारी ते दि. २९ फेब्रुवारीदरम्यान वेळोवेळी संपर्क साधला. तसेच त्यांना एका कंपनीच्या शेअरचे नाव सांगत या शेअरची खरेदी केल्यास त्यातून अधिक नफा मिळेल, असे अमिष दाखवले. त्यासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून शेअर खरेदी करायला सांगितले. ते खरेदी केल्यानंतर अॅपवरील खात्यावर वाढीव रक्कम दाखवून मोर यांचा विश्वास संपादन केला. त्यामाध्यमातून वेळोवेळी ३६ लाख १०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यापैकी दोन लाख ७० हजार रुपये परतावा दिला. मात्र उर्वरित ३३ लाख ३० हजार १०० रुपये न देता फसवणूक केली.