
सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा वादात; अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्यांवर प्रश्नचिन्ह
जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (DPDC) आढावा बैठकीनंतर बंद दरवाजामागे झालेल्या अर्वाच्य भाषेतील चर्चेने विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीबाबतही नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांची बदली स्थगिती आदेशानुसार १५ एप्रिल २०२५ पर्यंत रोखण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपूनही कोणतेही नवीन आदेश न मिळाल्याने ते अद्याप मूळ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीचे आदेश रद्द झाले आहेत का, की त्यांची नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात आली आहे, याबाबत विभागाकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
प्रशांत सोनवणे यांची या पदावरून याआधी दोन वेळा बदली करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पुन्हा जळगावमध्येच नियुक्ती मिळवली, तर दुसऱ्यांदा त्यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अधीक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली होती. या निर्णयाला त्यांनी मंत्रालयामार्फत स्थगिती मिळवत १५ एप्रिलपर्यंत नियुक्ती जपली. मात्र, आता स्थगिती कालावधी संपल्यानंतरही विभागाने पुढील कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या संदर्भात नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत आष्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. जळगावमधील कार्यकारी अभियंत्यांनीही “मला काही माहिती नाही,” असे सांगून पळवाट घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही अनास्था व अपारदर्शकता लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागात शिस्त व उत्तरदायित्व यांची नितांत आवश्यकता असल्याचे मत आता जिल्ह्यातील प्रशासनवर्तुळात व्यक्त होत आहे.