
पेट्रोल पंपावर डंपरची मशीनला धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
भडगाव-पाचोरा रस्त्यावरील घटना
भडगाव: प्रतिनिधी भडगाव-पाचोरा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. पंपावर डिझेल येणार असल्याच्या माहितीमुळे वाहनधारकांची मोठी गर्दी झालेली असताना, एका डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर थेट डिझेल भरण्याच्या यंत्राला (डिस्पेंसिंग युनिट) जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, डिझेल भरण्याचे मशीन जागेवरून उखडून दूर फेकले गेले, ज्यामुळे पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ
सोमवारी रात्री भडगावातील या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक नियंत्रण सुटलेला डंपर वेगाने आला आणि मशीनवर आदळला. मोठा आवाज झाल्याने आणि अपघाताचे गांभीर्य पाहून पंपावर उपस्थित असलेल्या चालक व नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. मोठी दुर्घटना घडण्याच्या भीतीने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धावाधाव केली.
सुदैवाने जीवितहानी टळली
हा अपघात भीषण होता, मात्र सुदैवाने डंपर थेट मशीनवर आदळल्याने आणि बाजूला असलेल्या नागरिकांना वेळीच बाजूला होता आल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनास्थळी पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पेट्रोल पंपाच्या परिसरात नागरिक आणि इतर वाहनधारकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





