वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले वर्षभरापूर्वीच बडतर्फ – छत्रपती शिवाजी ब्रिगेड

वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले वर्षभरापूर्वीच बडतर्फ – छत्रपती शिवाजी ब्रिगेड
जळगाव प्रतिनिधी I मराठा समाजाच्या महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांना वर्षभरापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजीच बडतर्फीचे आदेश जारी केले होते, मात्र त्याची प्रत संघटनेला नुकतीच मिळाली. या प्रकरणी बकाले यांची अवमानकारक वक्तव्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन झाले होते. जवळपास दोन वर्षे बकाले पोलिसांच्या तावडीत सापडले नव्हते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोनदा उपोषण करण्यात आले, तर नवी दिल्लीतील जंतरमंतरवरही आंदोलन झाले. समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शासनाने अखेर कारवाई केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत शरद पांडे, प्रकाशराव अडेलकर, मनिषा पाटील, डॉ. गणेश पाटील, आशा मौर्य आणि जे.बी. पाटील उपस्थित होते.





