रिक्षात प्रवासादरम्यान ६५ वर्षीय महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत लंपास; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रिक्षात प्रवासादरम्यान ६५ वर्षीय महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत लंपास; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : जळगाव बस स्थानक ते नवीपेठ या दरम्यान रिक्षातून प्रवास करत असताना ६५ वर्षीय महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेने २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरल्याची घटना मंगळवारी (दि. ३ जून) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलाबाई ताराचंदजी टाटिया (वय ६५, रा. सुशिला नगर, साक्री, जि. धुळे) या सध्या माहेरी – जळके (ता. पाचोरा) येथे आल्या आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता त्या बसने जळगाव येथे पोहोचल्या. गळ्यातील सोन्याची २५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तुटल्याने ती दुरुस्तीसाठी बहीण प्रेमलता चोपडा आणि वहिनी संगीता जैन यांच्यासह महावीर ज्वेलर्स, नवीपेठ येथे जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या.
बस स्थानकावरून घेतलेल्या रिक्षात त्यांच्यासह एक अनोळखी महिला देखील बसली होती. महावीर ज्वेलर्स येथे पोहोचून दुकानात गेल्यावर त्यांनी पर्स पाहिली असता पर्सची चैन उघडी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पर्समधील सोन्याची पोत तपासली असता ती गायब असल्याचे लक्षात आले.
या प्रकारामुळे लिलाबाई साथिया तत्काळ जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वीरेंद्र शिंदे करीत आहेत.