चोपडा : – महिला वकिलाचा ओळख परीचयातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून साखरपुडा होवून विवाह निश्चिती झाली. मात्र सासरकडील मंडळींनी हुंड्यात चारचाकीसह महागड्या ऑफिससाठी मोठी रक्कम मागितल्याने ती न दिल्याचा राग येवून सासरच्या मंडळींनी विवाह करण्यास नकार देत कुटूंबाची बदनामी करीत चोपडा तालुक्यातील मूळ रहिवासी व हल्ली नाशिक जिल्ह्यात स्थित महिला वकिलाची फसवणूक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात नियोजित वरासह त्याचे आई-वडील व मामाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली 31 वर्षीय तरुणी वकिली व्यवसायानिमित्त नाशिक जिल्ह्यात वास्तव्यास असून सन 2022 मध्ये तिची अमित रामचंद्र हस्तेकर या नाशिकच्या तरुणासोबत ओळख झाली व दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. एकमेकांच्या नातेवाईकांच्या सहमतीने दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला व चोपडा शहरात नातेवाईकांच्या समक्ष जानेवारी 2023 मधे त्यांचा साखरपुडा झाला.
28 जानेवारी 2023 रोजी दोघांचे लग्न निश्चित झाले असतांना भावी पती अमित हस्तेकर याच्यासह त्याचे वडील रामचंद्र हस्तेकर, आई अंजली रामचंद्र हस्तेकर, व मामा किरण उपासणी (मुंबई) अशांनी महिला वकिलास हुंडा स्वरुपात चारचाकी वाहन आणि भावी पती अमित हस्तेकर याचे नाशिक येथील ऑफीस बनवण्यासाठी अधिकच्या रकमेची मागणी केली. या मागणीस महिला वकील व तिच्या आई वडीलांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने व साखरपुडा झाला असतांनादेखील अमित हस्तेकर याच्यासह त्याचे आई वडील व मामा यांनी लग्नास नकार दिला व कुटूंबाची बदनामी केली. याप्रकरणी महिला वकिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आाल. तपास पोलिस नाईक प्रदीप राजपूत करत आहेत.