खान्देशजळगांवसामाजिक

वात्सल्याने भरलेला, कर्तव्यपूर्तीचा सोहळा म्हणजे उडान उपक्रम – डॉ.राहुल मयूर

रोटरी सेंट्रलतर्फे ५० सायकलींचे मोफत वितरण

जळगाव:- रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्याचे पाहिलेले स्वप्न म्हणजे वात्सल्याने भरलेला, कर्तव्यपूर्तीचा सोहळा आहे असे सहप्रांतपाल डॉ. राहुल मयूर यांनी प्रतिपादन केले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये उडान उपक्रम अंतर्गत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर विष्णू भंगाळे, अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात, प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना, डॉ. मयूर यांनी आर्थिक परिस्थितीमुळे शाळेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकलीमुळे उपयोग होणार असून साक्षरतेत देखील वाढ होईल. सायकलीला इंधन लागत नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला त्यामुळे गती मिळते. दोन चाके समतोल कसा ठेवायचा ते शिकवतात. वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण ब्रेक विद्यार्थ्यांना देत असतो असे सांगितले. विष्णू भंगाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

गरीब ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्यासाठी प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी खर्चाचा अर्धा वाटा तर रोटरी सेंट्रलचे डॉ. नरेंद्र जैन, महेंद्र रायसोनी, डॉ.अंजुम अमरेलीवाला, डॉ. राहुल मयूर, सी.ए. अनिल शाह, कल्पेश दोशी, संतोष अग्रवाल, शामकांत वाणी, दिनेश थोरात, रवींद्र वाणी, विपुल पारेख, मिलन मेहता, महेंद्र गांधी, ॲड. केतन ढाके, सुनिल बाफना , डॉ. राजेश जैन, राजू दोशी, ॲड. ओम त्रिवेदी, अनिल वर्मा , राजेश अग्रवाल, ॲड. रवींद्र कुलकर्णी, सचीन अग्रवाल , अमित अग्रवाल, दीपक नाथानी, रितेश माळी, लाला ठक्कर, , प्राचार्य गोकुळ महाजन , शाम कुकरेजा , विनय सुरतवाला , पंकज कासट आदींनी अर्धा वाटा उचलला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक कल्पेश दोशी यांनी तर सूत्रसंचालन व आभार दिनेश थोरात यांनी केले. कार्यक्रमास रोटरी जळगाव सेंट्रलचे डॉ. अशोक पाध्ये, इंजी. राजेश चौधरी ,वैद्य प्रणिता वडोदकर , या मान्यवरांसह विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button