एमपीडीए कायद्यांतर्गत मागील वर्षभरात कारवाई
गुन्हेगारांत सर्वाधिक धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश
जळगाव l २७ डिसेंबर २०२३ l जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर व हातभट्टी गुंडांच्या पोलीस विभागाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. गुन्हे दाखल या ५२ गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढविला असून, जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान तब्बल ५२ जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई केली आहे.
जानेवारी २०२३ या महिन्यात अमळनेर २, भुसावळ व चाळीसगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी- २३ मध्ये जळगाव मधील एकावर कारवाई करण्यात आली आहे . मार्च – २३ मध्ये जळगाव मधील २ जणांवर , अमळनेर व भुसावळमधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २३ महिन्यात चाळीसगाव, रावेर, जळगाव मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मे २०२३ या महिन्यात चोपडा, जळगाव व अमळनेर मधील प्रत्येकी एका व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जून २०२३ महिन्यात जळगाव मधील ३ जण, भुसावळ व यावल मधील प्रत्येकी एका जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जूलै २०२३ या महिन्यात भुसावळ मधील ३, अमळनेर, चाळीसगाव व जळगाव मधील प्रत्येक एक अशा ६ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ऑगस्ट २०२३ या महिन्यात जळगाव मधील ३, भुसावळ २, अमळनेर व चोपडा मधील प्रत्येक एक अशा ७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. सप्टेंबर २०२३ या महिन्यात जळगाव मधील ६ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. ऑक्टोंबर २०२३ या महिन्यात जळगाव मधील २, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर मधील प्रत्येक एक अशा ५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये एरंडोल मधील एका वाळू तस्कारांवर कारवाई करण्यात आली. डिसेंबर २०२३ या महिन्यात आतापर्यंत भडगाव, यावल, जळगाव व एरंडोल मधील एका जणांविरुद्ध अशा एकूण ४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. एक गुन्हा उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर सदर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत असते. जिल्ह्यात एमपीडीए दाखल गुन्हेगारांना नाशिक, औरंगाबाद, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर व मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आलेले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे.
५२ जणांवर ५१३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे
एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या या ५२ जणांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ दाखल आहेत. यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, जातीय दंगली व विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या ३७ धोकादायक गुन्हेगारांवर ३७१ गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ४ जणांवर २९ गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या ११ जणांवर ११४ गुन्हे दाखल आहेत.
काय आहे एमपीडीए कायदा ?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्या कोणत्याही व्यक्तींविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. कारवाईनंतर गुन्हेगाराला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.