खान्देश टाइम्स न्यूज | ३० डिसेंबर २०२३ | जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उप विभागीय अधिकारी शाम लोही तसेच राज्याचे तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणारी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील काही जागृत नागरिकांनी केलेली मागणी अखेर शासनाने मंजूर केली आहे. आयुक्त ढाकणेंसह आरटीओ श्याम लोही तसेच त्यांच्या समवेत असलेल्या काही जणांच्या चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
२०२२ मध्ये तत्कालिन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्यासह धुळयातील काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वाहनचालकांकडे आर्थिक लूट केल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला होता. तसेच चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून दरमहा ‘हप्ता’ही बांधण्यात आला होता. ‘हप्ता’ न देणाऱ्या वाहनचालकांना कायदा दाखवित त्यांना त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिकच्या उपअधीक्षका दीपाली पाटील यांच्याकरवी ही चौकशी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दि.१३ जानेवारी २०२२ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाली आहे. चौकशीनंतर आरटीओ विभागाचे अनेक कारनामे उजेडात येणार आहेत. तसेच त्रास सहन करणाऱ्या वाहनचालकांना या कारवाईच्या माध्यमातून दिलासा मिळणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.