वाराणसी ;- पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील भाजप आयटी सेलच्या तीन पदाधिकाऱयांना सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी वाराणसीतील आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीला बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ते बलात्कारी भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’, ‘लाडली बहना’ अशा योजना राबवणाऱया भाजपच्या राज्यातच मुली सुरक्षीत नसल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, तिन्ही पदाधिकाऱयांची भाजपने हाकालपट्टी केली आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना तब्बल 60 दिवस लागले. कुणाल पांडेय, आनंद ऊर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी अटक केलेल्या तिघा नराधमांची नावे आहेत. कुणाल पांडेय हा भाजप आयटी सेलचा वाराणसी विभागाचा संयोजक, तर सक्षम पटेल हा सह-संयोजक असून आनंद ऊर्फ अभिषेक चौहान हा आयटी सेलचा सदस्य असल्याचे उघड झाले आहे.
आयआयटी बीएचयूमध्ये मॅथेमेटिकल इंजिनीअरिंग विभागात बिटेक करणाऱया विद्यार्थिनीने दोन महिन्यांपूर्वी घटना घडल्यानंतर लगेच पोलिसांत जाऊन अंगावर काटा आणणारी आपबिती कथन केली होती. ही विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर रोजी न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून रात्री दीडच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती वाटेत एका मित्राला भेटली. त्याच वेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्पसमध्ये घुसले. त्यांनी दोघांना एकमेकांपासून दूर नेऊन धमकावले. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर तिला विवस्त्र करून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. हे सगळे करत असताना त्यांच्यातला एक जण व्हिडीओ रेकार्ंडग करत होता. या तरुणांनी विद्यार्थिनीचा फोन नंबरही घेतला.बिहार युथ काँग्रेसने बलात्कारी नराधमाचा स्मृती इराणींसोबतचा एक फोटो एक्सवरून शेअर करत मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. बलात्कारीचे हास्य बघा… महिला आणि बालविकास मंत्र्यांसोबत फोटोत हसणारा बलात्कारी… अशी टॅगलाईन फोटोला दिली आहे. हा फोटो स्मृती इराणींनाही टॅग करण्यात आला आहे.
यातील एकाचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे फोटोही काँग्रेसने शेअर केले आहेत.