जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे २८ व २९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत पश्विम विभागीय आंतर विद्यापीठीय संशोधन महोत्सव पार पडला. दोन दिवसीय चाललेल्या या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील १६ विद्यापीठे सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून संधी उपलब्ध् करून देणे हा महोत्सवाचा हेतू आहे. या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सोपान नांगरे यांनी औषध निर्माण शास्त्र गटातून सुवर्ण पदक प्राप्त केले तर तेजस पाटील याने आंतरविद्याशाखीय संशोधन गटात कास्य पदक प्राप्त केले. विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदींनी अभिनंदन केले. या स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. अमरदीप पाटील व डॉ. मनिषा देशमुख सहभागी होते. इतर गटात प्रदीप पाटील, दीपश्री मालखेडे, अविनाश पाटील, हेमांगी पाटील हे विद्यार्थी देखील सहभागी होते. सोपान नांगरे व तेजस पाटील हे एच.आर. पटेल औषधीनिर्माण शास्त्र महाविद्यालयात आहेत.