खान्देश टाइम्स न्यूज l १५ एप्रिल २०२४ l रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील प्रचाराला लागले असून मेळावा देखील घेण्यात येत आहे. श्रीराम पाटील समर्थक नावाने असलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सध्या काही पोस्टर, बॅनर व्हायरल होत असून त्यात जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी आणि खा.सुप्रिया सुळे यांचे फोटो वगळण्यात आल्याचे दिसत आहे. श्रीराम पाटलांच्या या पोस्टमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी दिसून येत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ सध्या चर्चेत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. रावेर मतदार संघातील २२० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून आणखी काही लोक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी यांची नावे चर्चेत होती. दोघांना डावलून तिसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याने संतोष चौधरी देखील बंडाच्या पवित्र्यात आहेत.
सुप्रिया सुळे, रविंद्र पाटील, संतोष चौधरींना वगळले
उमेदवार श्रीराम पाटील आपल्या मतदार संघात जोमाने प्रचाराला लागले असून मेळावे देखील आयोजित केले जात आहे. श्रीराम पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियात काही पेज आणि ग्रुप तयार करण्यात आले असून प्रचार केला जात आहे. रावेर तालुका माहविकास आघाडी मेळावा उद्या दि.१६ मंगळवारी आयोजित केला असून त्याचे एक पोस्टर ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये वॉलपेपरवर खा.सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी यांचे देखील फोटो नसल्याचे दिसून येते.
नाराजी की प्रिंटिंग मिस्टेक?
गेल्या दोन – तीन दिवसात श्रीराम पाटील यांच्या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होत असून त्यात दिग्गज आणि स्थानिक नेत्यांचे फोटो वगळण्यात आले आहेत. उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याने रविंद्र भैय्या पाटील व संतोष चौधरी यांचे फोटो वगळले की प्रिंटिंग मिस्टेक असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीराम पाटील गटाचे नियोजन चुकत असल्याचे हे दुसरे उदाहरण असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.