
भाजपकडून नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा
पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर तर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी
जळगाव प्रतिनिधी l
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये जळगाव पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची निवड झाली आहे, तर जळगाव पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, जळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
भाजपने दोन मराठा आणि एक गुजर समाजातील नेत्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.
चंद्रकांत बाविस्कर यांनी जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून, ते गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या या अनुभवामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, दीपक सूर्यवंशी यांनी यापूर्वी महानगराध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली असल्याने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.