इतर

रस्त्यावर प्रसूतीची घटना गंभीर, सीईओ मिनल करनवाल यांचा आरोग्य विभागाला दणका

रस्त्यावर प्रसूतीची घटना गंभीर, सीईओ मिनल करनवाल यांचा आरोग्य विभागाला दणका

जळगाव,  (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील कर्जाणे आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात एका आदिवासी महिलेला भर रस्त्यावर प्रसूती करावी लागल्याच्या धक्कादायक घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती मीनल करनवाल यांनी आरोग्य विभागाला कडक शब्दांत जाब विचारत यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले आहे.

दि. ३० मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना सीईओ करनवाल यांनी ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पुरवणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी असून, यामध्ये कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

महत्त्वाचे निर्देश :

▪️ आदिवासी भागासाठी कृती आराखडा: गर्भवती आणि बाळंत महिलांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबविण्याचे आदेश.
▪️ औषध वितरण व्यवस्था सक्षम करणे: आवश्यक औषधांचा नियमित व वेळेवर पुरवठा होईल, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश.
▪️ रुग्णवाहिका व्यवस्थेत सुधारणा: प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस ट्रॅकर बसवून तिची हालचाल थेट ट्रॅक करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मदत मिळेल.
▪️ आरोग्य कर्मचाऱ्यांचे जबाबदारीपूर्ण वर्तन: सेवाभाव, शिस्त आणि तत्परता ही आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख ठरावी, अशी स्पष्ट अपेक्षा सीईओंनी व्यक्त केली.

या बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व उपस्थितांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एकजूटीनं आणि जबाबदारीनं काम करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा प्रशासनाच्या या तात्काळ पावलांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीईओ श्रीमती मीनल करनवाल यांच्या ठाम भूमिका आणि त्वरित कृतीमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला एक नवसंजीवनी मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button