
जळगावात ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; पोलिसांची मोठी कारवाई
दोन गुन्ह्यांत जप्त केलेले अंम्फेटामाइन व मेथाक्वालोन नियमानुसार नष्ट; संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आले. अंम्फेटामाइन (Amphetamine) आणि मेथाक्वालोन (Methaqualone) या अंमली पदार्थांचा या कारवाईत समावेश असून, पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित विभागांच्या आदेशांचे पालन करून ही प्रक्रिया राबविण्यात आली.

९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून जप्त अंमली पदार्थ सीलबंद अवस्थेत बाहेर काढण्यात आले. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर उपस्थित होते. त्यानंतर हे पदार्थ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ या संस्थेकडे नाशासाठी पाठविण्यात आले.
या दोन गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत ६५ कोटी ७० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या मान्यतेनंतर ही कार्यवाही करण्यात आली. नाश प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व राहुल बैसाणे, पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील व उमाकांत पाटील यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.
तसेच सशस्त्र पोलीस गार्डचे पोलीस नाईक शैलेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे, आशुतोष सोनवणे व केतन सूर्यवंशी यांनीही जबाबदारी पार पाडली. शासकीय छायाचित्रकार पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत चौधरी यांनी नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. पंच म्हणून सुनील बाबुराव विसावे आणि संजय गोविंद रंधे उपस्थित होते.
जप्त अंमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावून अवैध अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ही कार्यवाही केली.




