
कामगारांच्या प्रश्नांसाठी आता अर्जुन पवार मैदानात; लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
जिल्ह्यातील वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याचा निर्धार

जळगाव, प्रतिनिधी : लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन काशिनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या विविध समस्या, हक्कांचे प्रश्न तसेच वंचित कामगारांच्या अडचणी शासन व प्रशासनाच्या पातळीवर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र महाजन यांच्या हस्ते अर्जुन पवार यांना जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती देण्यात आली. यावेळी संघटनेचे खजिनदार प्रविण महाजन उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना अर्जुन पवार यांनी जिल्ह्यातील कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगारांच्या विविध समस्या संबंधित विभाग व प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
अर्जुन पवार हे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




