
सराईत गुन्हेगार ‘तन्या’ येरवडा कारागृहात स्थानबद्ध
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई
जळगाव: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवायांचा बडगा अधिक तीव्र केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्या रहीम शेख (२१, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) अधिनियमांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
तन्वीर ऊर्फ तन्या याच्यावर जबरी चोरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, दुखापत करणे, दंगल, घरफोडी आणि आर्म्स ॲक्ट यांसारखे ११ गंभीर गुन्हे नोंद आहेत. २०२२ ते २०२६ या कालावधीत त्याच्यावर हद्दपारीसह विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या; मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी ११ ऑगस्ट रोजी सादर केलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १४ ऑगस्ट रोजी स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात दाखल केले. सण-उत्सवाच्या काळात कायदा बिघडवणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





