जळगाव ;- भुसावळ येथील व्यापाऱ्याला व्हाट्सअप आणि टेलिग्राम या सोशल मीडिया खात्यावर टास्क पूर्ण केल्यानंतर अधिक नफा देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ६ लाख ९१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि भुसावळ खडका रोड येथे राहणारे ३७ वर्षीय व्यापारी शोएब खान रऊफ खान यांना १७ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान टेलिग्राम या सोशल मीडिया साईट वरून सुनीता अदिती , आणिका महेश जॉब वरून लिंक देऊन लॉगिन करून वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यावर अधिक नफा देऊ असे खोटे आश्वासन देण्यात आले. तसेच फिर्यादी शोएब खान यांच्या आई आणि पत्नी यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी ६ लाख ९१ हजार ७८ रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला. यानंतर शोएब खान यांनी सायबर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहे.