कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ
जळगाव;- जीवनात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. कष्ट घ्यावेच लागतात कारण कष्टाशिवाय गुणवत्ता प्राप्त होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. त्यामुळे भविष्यातील मोठे नुकसान टळेल असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभागाव्दारे जागतिक युवा दिनाचे औचित्य साधुन कुलगुरू संवाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी कुलगुरूंनी पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांशी तर दुस-या टप्यात प्राध्यापकांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणााले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि माहिती यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण हे मेंदूला समृध्द करते. त्यामुळे अवलोकन, विश्लेषण आणि आकलन क्षमता वाढीला लागते. त्यातुनच नवसंकल्पनांना चालना मिळून नवउद्योजक जन्माला येतात. देशात आज घडीला एक लाखांपेक्षा अधिक नवउद्योजक तयार झाले आहेत. यातील ४० टक्के ग्रामीण भागातील आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे संकल्पनाधिष्ठीत आहे. बदल स्वीकारल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आचार, विचार, व्यवहार, वागणूक यामध्ये अनुशासन हवे. अनुशासन हा आपल्या स्वत:मधील व आपल्या ध्येयामधील पूल आहे. वेळेचे महत्व ओळखावे. चांगल्या मित्रांचे नेटवर्क तयार करावे असे आवाहन करतांना कुलगुरूंनी विद्यापीठाच्या विविध योजनांची माहिती दिली. परीक्षेत कॉपी करू नका असेही यावेळी त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे कुलगुरूंनी निरसन केले.
दुस-या टप्यात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यापीठ परीक्षा, ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आजची प्रतिमा व मानसिक अवस्था याबाबत त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला. प्राध्यापकांच्या प्रश्नाचीही उत्तरे त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. अध्यक्षस्थानी लेवा एज्युकेशनल युनियनचे सहसचिव प्रा. व. पु. होले होते. प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी स्वागतपर भाषण केले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा पालवे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुजाता गायकवाड व डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. प्रा. निताली अहिरे यांनी आभार मानले. सृती मराठे या विद्यार्थिंनीने महापुरूषांच्या कार्याला उजाळा दिला.