जळगाव : महापालिकेकडून टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यांवरील अतिक्रमणविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने टॉवर चौकापासून ते नेहरू चौकापर्यंतच्या रस्त्यामधील दुभाजकापासून दोन्ही बाजूला १२-१२ मीटर अंतर मोजून तेथे मार्किंग केली असून या मार्किंगच्या मध्ये रस्त्यात वाहने लावणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी देखील मनपा व शहर वाहतुक शाखेच्या पथकाने २१ वाहनांवर कारवाई केली.
महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याच्या सुचना बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत.
त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला १२-१२ मीटर अंतरावर सिमेंटचे ब्लॉक्स जमिनीत गाडून रस्त्यांची बॉर्डर लाईन निश्चित केली आहे. तसेच या बॉर्डर लाईनच्या मध्ये रस्त्यात वाहने लावणाऱ्यांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
रस्त्यात लागलेल्या दुचाकी ट्रॅक्टरमध्ये चढवून थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात केल्या जात आहेत. त्यानंतर वाहतूक शाखेकडून संबधित वाहन धारकांना बेसिस्तपणे वाहन पार्क केल्याप्रकरणी दंडाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सध्या शहरातील टॉवर चौक ते नेहरू चौक भागातील अतिक्रण नियंत्रणात आले असून रस्ता रहदारीसाठी मोकळा झाला आहे. महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून जप्त झालेल्या वाहनधारकांना मात्र, आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मनपा व वाहतूक शाखेच्या पथकाने पहिल्या दिवशी (गुरूवारी) ३४ वाहनांवर कारवाई केली असून दुसऱ्या दिवशी २१ वाहनधारकांवर कारवाई झाल्यामुळे वाहनधारकांना शिस्त लागलेली दिसून येत आहे.