रिफॉर्मेशन कपला जल्लोषात सुरुवात..
यंदाचे दुसरे वर्ष : आत्महत्या मुक्त समाज विषयावर प्रबोधन
खान्देश टाइम्स न्यूज l १३ जानेवारी २०२४ l मुस्लीम समाजातील युवकांना एकत्र करीत त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला वाव देण्याच्या हेतूने प्रेरित रिफॉर्मेशन कपच्या दुसऱ्या पर्वाला शुक्रवारी युवा दिनाचे औचित्य साधत सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदा देखील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
मुस्लीम समाजातील ११ युवकांनी एकत्र येत गेल्यावर्षी युवकांना जोडण्यासाठी आणि समाज प्रबोधनाच्या हेतूने रिफॉर्मेशन कप या क्रिकेट सामन्याची संकल्पना मांडली होती. आयपीएल प्रमाणे खेळाडूंचा लिलाव आणि संघ प्रायोजकत्व अशी पद्धत असलेल्या स्पर्धेत दरवर्षी एक नवीन संकल्प ठेवत त्यावर प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी नशामुक्त समाज या विषयावर तर यंदा आत्महत्यामुक्त समाज या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे.
युवा दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी शिवतीर्थ मैदानावर क्रीडा सामन्यांना सुरुवात झाली. स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले असून प्रत्येक संघाचे ३ सामने होणार आहेत. उत्कृष्ट प्रकाश यंत्रणा, खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी, आवाज आणि समालोचक, लाईव्ह स्ट्रिमिंग अशा विविध सुविधा स्पर्धेठिकाणी देण्यात येत आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे अंतीम सामने रविवार दि.१४ रोजी खेळवले जाणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीतील रेहान सर, शारीक शेख, आसिफ मिर्झा, आसिफ देशमुख, जकी अहमद, आमिर शेख, आमिर गोल्डन, शोएब बागवान, अलफैज पटेल, शोएब खान, अजहर खान यांच्यासह इतर सदस्य परिश्रम घेत आहेत.