भुसावळ : ;- भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी, 13 रोजी दुपारी घडली होती. या घटनेत भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) या तरुणाचा खून करण्यात आला होता. .पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवघ्या काही तासात संशयित निष्पन्न केला असून त्याला कोपरगाव येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले आहे. रोशन बबन हुसळे (28, फेकरी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
मित्रांमध्ये झालेल्या वादातून भावेश अनिल भालेराव रा. भगवान साळवे नगर, या तरुणाच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत भावेश भालेराव व रोशन हुसळे यांच्यात पैशांचा वाद होता व पैशांवरून भावेश सातत्याने रोशनकडे तगादा लावत होता. शनिवारी दुपारीदेखील उभयतांमध्ये वाद झाला. यावेळी चाकूचे वार करीत भावेशचा खून करण्यात आला. खुनानंतर संशयित पसार झाला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील यांनी संशयिताला निष्पन करीत कोपरगाव येथे पळून जाण्यापूर्वीच त्यास अटक केली. अटकेतील संशयित हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सींग खेळाडू असल्याची माहिती आहे. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्यांनी दुपारी घटनास्थळी धाव घेतली.