मारवड : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील अश्विनी अरुण पाटील (31) या आशा स्वयंसेविकेच्या आत्महत्ये प्रकरणी गावातील चौघांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारीत्र्यावर संशय घेवून महिलेची बदनामी करण्यात आल्याने त्रस्त महिलेने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्महत्या केली होती. ही घटना 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मांडळ येथे घडली होती.
मांडळ गावातील आशा स्वयंसेविका अश्विनी अरुण पाटील (31) ही महिला पतीच्या निधनानंतर सासरे व दोन मुलांसह वास्तव्यास होती. संशयित आरोपी दत्तात्रय महादू पाटील, चंद्रभागा दत्तात्रय पाटील, विठोबा दत्तात्रय पाटील, किर्ती विठोबा पाटील यांनी महिलेच्या चारीत्र्यावर वेळोवेळी संशय घेतला शिवाय तिला मारहाण केली तसेच वरपर्यंत आमची ओळख असल्याने आमचे कुणीही काहीही करणार नाही, असा दमदेखील भरला. आरोपींच्या जाचाला कंटाळल्याने महिलेने 12 रोजी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकत पेटवून घेतले होते. या घटनेत महिला 70 टक्के भाजल्यानंतर तिला धुळ्यात उपचारार्थ हलवलण्यात आले मात्र 17 रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. मयत महिलेचा भाऊ हितेंद्र वाल्मीक निकम (पाटील, रा.आंचळगाव, ता.भडगाव) यांनी मारवड पोलिसात धाव घेत वरील चौघांविरोधात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शीतल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.