जळगाव ;- एकाच्या ३९ हजार रूपये किंमतीच्या बोकड व बकऱ्यांची चोरी केल्याचा प्रकार शहरातील व्यंकटेश नगर परिसरात सोमवार २३ ऑक्टोबर रोजी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून याप्रकरणी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील व्यंकटेश नगरात विजयकुमार नंदलाल कुमावत (वय-४२) हे आपल्या परिवारासह राहत असून त्यांनी दुय्यम व्यवसाय म्हणून बकऱ्या पाळलेल्या आहेत. सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर ३९ हजार रूपये किंमतीचे दोन बोकड आणि दोन बकऱ्या बांधलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.