जळगाव;- समाजात शांतता प्रस्थापित करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३ या वर्षात ११९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. २०२१ व २०२२ या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे.
गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी १०७, १०९ व ११० अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते.
२०२१ या वर्षात ८८०६ व २०२२ या वर्षात ९०८३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर या कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे .
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक कारवाई बाबत घ्यावयाच्या दक्षता याविषयावर संयुक्त कार्यशाळा ही नुकतीच घेण्यात आली आहे. सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने परिपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाधिकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा लिहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती दिवसात काढावा. याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अधिकारी – कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. निवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल विभागाचे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस विभागाने समन्वय ठेवत काम करावे. अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.