जळगाव : सासू सुनांच्या कौटुंबिक वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या मैसुनाबाई दिलीप तडवी (वय ४५, रा. घोरकुंड, ता. सोयगाव) यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला . दरम्यान, वादावेळी झालेल्या झटापटीत विषारी औषध सुनांच्या अंगावरही पडल्याने त्यांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यातील घोरकुंड येथे मैसुनाबाई तडवी या वास्तव्यास होत्या. त्यांचा दि. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या सुना सपना राजू तडवी (वय २५) आणि रुबीना आशिष तडवी (वय २२) यांच्यासोबत कौटुंबिक कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. यात मैसुनाबाई यांनी रागाच्या भरात पिकांवर फवारणीचे औषध प्राशन केले होते. त्यावेळी दोन्ही सुनांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावरदेखील विषारी औषध पडले आणि त्यांना देखील विषबाधा झाला. तिघांची तब्बेत खालावल्याने त्यांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर यातील मैसुनाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यासह सुनांनादेखील जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मैसुनाबाई तडवी यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना रात्री मैसुनाबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतररुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.