
कुसुंबा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
एमआयडीसी पोलिसांची तत्काळ कारवाई, ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, ;- कुसुंबा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि होंडा शाईन दुचाकी असा एकूण ७२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीनुसार केली कारवाई
८ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा परिसरात तुषार अशोक सोनवणे (रा. खेडी आव्हाणे) नावाचा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक छगन तायडे, किरण पाटील आणि राहुल घेटे यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.
संशयिताचा पाठलाग करून केली अटक
पथक हॉटेल पुष्पा (नशिराबाद रोड) येथे गस्त घालत असताना, हळदी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण मोसावर बसलेला आढळला. पोलिस त्याच्या दिशेने जाताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
झडतीत गावठी कट्टा आणि काडतुसे आढळली
अटक केल्यानंतर संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या कमरेत २०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच, ५०,००० रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकीही जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल,
या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन ठाकूर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस नाईक योगेश बारी करत आहेत.