खान्देशजळगांवशासकीय

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घ्यावा!

अमृत’ संस्थेच्या अधिकार्‍यांचे आवाहन; ‘अमृत’च्या अधिकार्‍यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

जळगाव;– खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. ‘अमृत’ हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे, या संस्थेच्या लाभार्थ्यांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, व आपली उन्नती करावी, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे अधिकारी व जळगाव, धुळे-नंदूरबार जिल्ह्यांचे पालक अधिकारी हरिष भामरे यांनी येथे केले. ‘अमृत’च्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन स्वतंत्र अर्ज दाखल करावेत, असेही भामरे म्हणालेत.
जळगाव येथे बुधवारी (दि.१७) विविध सामाजिक मान्यवर व लाभार्थ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक, विविध प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा आदींचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भामरे यांनी लाभार्थ्यांना ‘अमृत’च्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भामरे म्हणालेत, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, स्वयंरोजगारासाठी या घटकाला प्रोत्साहन देणे व लघुउद्योग निर्मितीस चालना देणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, आदी ‘अमृत’च्या योजना आहेत. या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही हरिष भामरे यांनी याप्रसंगी केले.

खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर संस्था, महामंडळ अथवा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत असताना अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असेही भामरे यांनी सांगितले. मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थित लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भामरे यांनी शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांसह लाभार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांना ‘अमृत’च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक द्वारकाधीश जोशी यांच्यासह विभागीय समन्वयक दीपक जोशी, जळगाव जिल्हा समन्वयक राजेंद्र कानडे, शामकात कलभंडे, कमलाकर फडणीस, नीलेश राव, उदय खेडकर, प्रविण कुलकर्णी, अशोक वाघ आदींसह जळगाव, भुसावळ, फैजपूर येथील लाभार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button