खान्देशगुन्हेजळगांवशासकीयसामाजिक

पोलिस कर्मचारी शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार – आ मंगेशदादा चव्हाण

जळगाव ;- काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शुभम अनिल आगोणे या तरुणाची चाळीसगाव येथे निर्घृण हत्या केली होती. स्व.शुभमला न्याय मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी (ता. 22) चाळीसगाव शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास संबोधित करताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शुभमच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

शुभमच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार मंगेशदादा चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चात सहभागी झाले. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. शुभम मुंबई पोलीस दलात असल्याने मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या निमित्ताने त्याची आणि माझी नेहमी भेट होत असे. मागील वर्षी झालेल्या रायगड वारीत देखील तो आपल्या मित्र मंडळींसह तीन दिवस आमच्यासोबत होता. नुकत्याच झालेल्या नमो चषक स्पर्धेत देखील त्याच्या संघाने सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांचा सामना होण्याच्या आदल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. त्यांना जात, धर्म, पक्ष नसतो. शुभमची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली ते पाहता अशी गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी सदर प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून लवकरात लवकर सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. आज प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हाच संकल्प करूया की अशा समाजविघातक प्रवृत्तीला कुठल्याही प्रकारचा थारा मिळणार नाही. शुभमला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असेही आमदार श्री. चव्हाण यांनी बोलून दाखवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button