गुन्हेजळगांवशासकीयशिक्षण

दोन ‘दीपक’ने जाळली बालकल्याण समितीच्या बरखास्तीची वात!

खान्देश टाइम्स न्यूज | २७ जानेवारी २०२३ | एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतिगृह अत्याचार प्रकरणी बाल कल्याण समिती, जळगांवच्या अध्यक्ष व २ सदस्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला असतानाही त्यांना अटक व निलंबन झालेले नाही. जिल्ह्यातील खा.उन्मेष पाटील व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तिघांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी करीत तक्रार केली होती. तसेच तिघांच्या नियुक्ती रद्दसाठी मासू संघटनेचे दीपक सपकाळे यांच्यासह दोघांनी आमरण उपोषण पुकारले होते. ९ दिवसांनी अखेर प्रजासत्ताक दिनी शासनाला जाग आली असून या बालकल्याण समितीची नियुक्ती समाप्त करण्यात आली आहे.

एरंडोल तालुक्यातील खडके येथील वसतिगृह अत्याचार प्रकरणी बाल कल्याण समितीतील अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे, सदस्य संदिप पाटील या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन सदर सदस्यांची राज्य चौकशी समितीद्वारे ऑगस्ट – २०२३ महिन्यातच चौकशी पुर्ण करण्यात आली होती. एरंडोल पोलीस स्टेशन येथे दि.२६.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. खडके बालगृह अत्याचार प्रकरणाची माहिती पिडितांनी बाल कल्याण समिती अध्यक्ष व दोन सदस्य यांना सर्वप्रथम दिली होती. एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याच्या ६ महिने अगोदर या संपूर्ण प्रकरणाचा घटनक्रम माहिती बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य अध्यक्ष देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे, सदस्य संदिप पाटील यांना माहिती होता असल्याचे समोर आले होते. पीडित बालिकेने देखील फिर्यादीत तसे नमूद केले होते.

फिर्यादीवरून पोलिसात संशयितांवर भा. द. वि. कलम ३२४,३५४,३७६(२)(n)(क),३२३,५०६, पोस्को कायदा २०१२ अंतर्गत ४,५(फ) (एल) (ओ) ,६,८,९(फ)(एल)(ओ) ,१९,२१,८२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे संस्थेच्या माध्यमातून खाजगी रित्या चालवल्या जाणाऱ्या कै. य. ब. पाटील, मुलींचे बालगृह, खडके येथील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटनेची तक्रार बाल कल्याण समिती, जळगाव येथील अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे व सदस्य संदीप पाटील यांना पिडीत बालिकांनी तोंडी व चिठ्ठी लागून सर्वप्रथम सांगितली होती.

गुन्ह्याची माहिती असतांना देखील त्याचवेळी तिघांनी गुन्हा दाखल न करता आरोपीची पाठराखण करत सदर बाब अनेक दिवस दाबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला होता. तसेच बाल कल्याण समितीतील अध्यक्ष, सदस्य यांना देखील गुन्ह्यात कलम १२० ब प्रमाणे गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी करीत शासनाकडे तिघांना समिती पदावरून हटवण्यासाठी पाठपुरावा करून तक्रार गुप्ता यांनी केली होती. तसेच बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार यांच्यासह दोन्ही सदस्यांना तात्काळ बरखास्त करावे, या तीन महाशयांना या पुढे शासनस्तरावर कोणत्याही शासकीय समितीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात येवू नये. या तिघांना बालकल्याण समिती येथे येण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीसाठी गेल्या ८ दिवसापासून शिवतीर्थ मैदानावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) संघटनेचे दीपक सपकाळे यांच्यासह दोघांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले होते.

दोन्ही दीपककडून करण्यात आलेल्या तक्रारीला काही अंशी यश आले असून तक्रारीची गांभीर्याने दखल घेत समिती बरखास्त करण्याचे आदेश पारित केले.

शुक्रवारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वनिता सोनगत यांनी युनियनच्या दीपक सपकाळे यांना प्रत्यक्ष भेट घेत पत्राद्वारे सदर बालकल्याण समिती बरखास्त केल्याची माहिती दिली. तसेच स्वतः ज्यूस देऊन सपकाळे यांच्यासह तिघांचे उपोषण देखील सोडविले. दरम्यान, हा लढा इथेच संपणार नसून तिघांविरुद्ध खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दीपक कुमार गुप्ता आणि दीपक सपकाळे यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल नसलेल्या इतर सदस्यांना का हटविण्यात आले याची देखील चौकशी करणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button