जळगावः – अमळनेर पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२, रा. मुठेचाळ, स्टेशन रोड, अमळनेर) व जामनेर पोलीस ठाण्यात ६ गंभीर गुन्हे दाखल असलेला योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय ३२, रा. बजरंगपुरा, ता. जामनेर) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्या स्थानबद्धतेचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहेत.
अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण उर्फ माकू नामदास याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी असे चार तर जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश उर्फ भुऱ्या चव्हाण याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, दारुबंदी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हेदाखल आहेत. या दोघांची समाजात दहशत वाढत असल्यामुळे त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी रमणनामदास तर व जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी योगेश उर्फ भुऱ्या चव्हाण याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव त्याार करुन तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून तो मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावावर स्वाक्षरी करत स्थानबद्धतेचे आदेश पारित केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर, धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोनि किरण शिंदे, पोनि विजय शिंदे, पोउनि सागर काळे, रमेश कुमावत, सुनिल राठोड, निलेश सोनार, विकास देवरे, अनिल भुसारे, दीपक माळी, किशोर पाटील, सिद्धार्थ शिसोदे यांनी हा प्रस्ताव तयार केला. एलसीबीचे सफौ युनूस शख इब्राहीम, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी कामकाज पाहिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांच्या एमपीडीएचे आदेश पारित केल्यानंतर योगेश उर्फ भुऱ्या चव्हाण याला ठाणे जिल्हा कारागृहात तर रमण उर्फ माकू याची कोल्हापूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या दोघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाली असून जिल्ह्यातील इतर सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत.